घरमालकांनी ४० टक्के सवलतीसाठी अर्ज करावा   

महापालिकेचे आवाहन

पुणे : स्वमालकीच्या निवासी मिळकतीत राहाणार्‍या नागरिकांनी पीटी ३ अर्ज भरून दिल्यानंतरही त्यांना मिळकत करात चाळीस टक्के सवलत मिळाली नाही, अशा नागरिकांनी नजीकच्या क्षेत्रीय कार्यालयातील मिळकत कर कार्यालयात जाऊन खातरजमा करावी. पीटी ३ अर्जासोबत आवश्यक कागदपत्र दिली नसल्यास त्याची पूर्तता करावी, असे आवाहन महापालिकेच्या मिळकत कर विभागाने केले आहे.
 
महापालिका एक एप्रिल २०१९ पूर्वी मिळकत कर आकारणी झालेल्या मिळकतींना करामध्ये चाळीस टक्के सवलत देत होती. मध्यंतरी सरकारने ही सवलत काढून घेतली. जीआयएस पाहणीनंतर एक एप्रिल २०१८ पासून एकहून अधिक मिळकती असलेल्या काही मिळकतींची चाळीस टक्के सवलत काढून घेण्यात आली होती. दरम्यान, २०२३ मध्ये शासनाने ही सवलत पुन्हा जाहीर केली. पुन्हा ही सवलत लागू करताना संबधित मिळकतधारकांकडून ते स्वत: त्या मिळकतीत राहात असल्याबाबत पीटी ३ फॉर्म भरून घेतले तसेच दोन रहिवासी पुरावे देखील घेण्यात आले आहेत. 
 
या पीटी ३ फॉर्मनुसार मिळकतींची तपासणी करून पुर्तता करणार्‍या मिळकतधारकांना २०२५-२६ च्या मिळकत कराच्या बिलांमध्ये ४० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसा उल्लेखही बिलांवर करण्यात आला आहे. मात्र, ज्या मिळकत धारकांनी पीटी ३ फॉर्मसोबत आवश्यक पुरावे दिले नाहीत, त्यांना करात सवलत देण्यात आलेली नाही. अशा नागरिकांनी ते राहात असलेल्या क्षेत्रिय कार्यालयांतील मिळकत कर विभागात जावून आवश्यक रहिवासी पुरावे व कायदेशीर पूर्तता करावी, असे आवाहन अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी केले आहे.

Related Articles